काबुल : अफगाणिस्तानच्या सैन्याने केलेल्या कारवाईमध्ये २० तालिबान्यांचा खात्मा करण्यात आला आहे. कंदहार प्रांतामध्ये मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. यासोबतच, या कारवाईमध्ये शस्त्रास्त्रे आणि दारुगोळाही नष्ट करण्यात आल्याची माहिती देशाच्या संरक्षण मंत्रालायने दिली आहे.
यासोबतच, मंगळवारी अफगाणी सैन्याने हेरात प्रांतात केलेल्या कारवाईमध्ये २७ लष्करी कर्मचारी आणि सात नागरिकांची तालिबानकडून सुटका करण्यात आली. या सर्व कैद्यांचा तालिबान्यांकडून मोठ्या प्रमाणात छळ केला जात होता. या कारवाईदरम्यान सहा तालिबानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. संरक्षण मंत्रालयाने दुसऱ्या एका ट्विटमध्ये याबाबत माहिती दिली.
दरम्यान, अफगाण राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार हाजी नझीर अहमदजाई यांनी स्पुटनिक या वाहिनीला मंगळवारी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी तालिबान आणि अफगाण सरकारमधील शांतता चर्चा या केवळ वेळेचा अपव्यय असल्याचे मत व्यक्त केले. जोपर्यंत देशातील हिंसाचार कमी होऊन, शस्त्रसंधी लागू होत नाही तोपर्यंत अशा चर्चांना काहीही अर्थ नाही असे ते म्हणाले.
हेही वाचा : चीनकडे झुकते माप नाही, भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याची नेपाळची इच्छा