काबूल - अफगाणिस्तानातील काबूल विद्यापीठावर काल (सोमवार) दहशतवादी हल्ला झाला. यात २० जणांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. बंदुकधारी हल्लेखोरांनी विद्यापीठात घुसून गोळीबार केला. स्थानिक वृत्तपत्रांनी यासंबंधी वृत्त दिले आहे.
पुस्तक प्रदर्शनात गोळीबार
काबूल विद्यापीठात पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्धाटन अफगाणिस्तानातील इराणच्या दुतावासाकडून करण्यात येणार होते. मात्र, कार्यक्रम स्थळी अचानक दहशतवादी शिरले, त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. तसेच दहशतवाद्यांनी स्फोटही घडवून आणला. हल्ल्यामुळे सगळीकडे गोंधळ उडाला. विद्यार्थी आणि कर्मचारी मिळेल त्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. अनेक जण वेळीच बाहेर पडल्याने हल्ल्यातून बचावले.
शैक्षणिक संस्थांवरील हल्ला क्रूरपणा
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने स्वीकारली नाही. तालिबान-अफगाणिस्तान शांतता चर्चेचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. शैक्षणिक संस्थांवरील हल्ला ही अत्यंत क्रूर घटना आहे. शांतता आणि सुरक्षित वातावरणात शिक्षण घेण्याचा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. पीडित कुटुंबीयांप्रती मी दु:ख व्यक्त करतो. देशविरोधी शक्तींवर आपण नक्कीच विजय मिळवू, असे अब्दुल्ला शोक संदेशात म्हणाले.