तेहरान - इराणमध्ये कोरोनोबाधितांची संख्या आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे शनिवारीपासून दोन आठवडे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.
प्रेस टीव्हीनुसार, या लॉकडाऊनअंतर्गत राजधानी तेहरानसह 150 रेड-अलर्ट असलेल्या शहरांमधून प्रवास करण्यास दोन आठवड्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच, दररोज रात्री 9 वाजल्यापासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत संचारबंदी असेल.
यामध्ये रेड झोन्समध्ये एक तृतीयांश सरकारी कर्मचारी उपस्थित राहणेही बंधनकारक केले आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात जोखीम असलेल्या शहरांमध्ये अनावश्यक प्रवास करण्यास बंदी घातली आहे. हे नवीन नियम काटेकोरपणे लागू केले जातील आणि उल्लंघन करणार्यांना दंड होणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा - 2021चा उन्हाळा जवळजवळ सामान्य असेल : बिल गेट्स
मंत्रालयाने म्हटले आहे की, दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत नव्या रुग्णांची वाढ आणि मृत्यूची संख्या चौपट वाढली आहे. यामुळे लॉकडाऊन लागू करावा लागला.
गेल्या आठवड्यात, दररोज संक्रमितांच्या संख्येने 13 हजाराचा आकडा पार केला. तर, मृतांची संख्या 500 च्या जवळपास पोहोचली आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, देशात पसरलेल्या साथीविरूद्ध लढा सुरू असताना पुढील दोन आठवडे महत्त्वपूर्ण आहेत.
शनिवारपर्यंत इराणमध्ये कोरोनाचे एकूण 8 लाख 28 हजार 377 रुग्ण आढळले आहेत. तर, 43 हजार 896 लोकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार, 8 जखमी