लंडन - कोरोना महामारीवर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ धडपडत आहेत. या स्पर्धेत लंडनचे इम्पीरिअल कॉलेजही उतरले आहे. या कॉलेजमधील शास्त्रज्ञ हे कोरोनाच्या लसीची लवकरच मानवावर चाचणी करणार आहेत.
जगभरात सुमारे 12 लसी या निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात आहेत. त्यांची हजारो लोकांवर चाचणी होणार आहे. यामधून किती यश मिळेल, याची खात्री नाही. मात्र, किमान वर्षाखेर कोरोनाची लस सापडेल, अशी आशा आहे.
कोरोनाची जगभरातील 80 लाख लोकांना लागण झाल्याचा इशारा अनेक वैज्ञानिकांनी दिला आहे. तर 4 लाख 37 हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीने जगभरात सुरू केलेले मृत्यूतांडव हे लसीनेच थांबू शकते, असे शास्त्रज्ञांना वाटते. लसनिर्मितीसाठी साधारणत: काही वर्षे लागत असतात.
इम्पीरिअल कॉलेजमध्येे तयार केलेल्या कोरोनाची लस ही 300 निरोगी व्यक्तींना देण्यात येणार असल्याचे इंग्लंड सरकारने म्हटले आहे. त्यासाठी इंग्लंड सरकारने 51 दशलक्ष डॉलरची मदत केली आहे.
इम्पीरिअलच्या लसनिर्मिती केंद्राचे प्रमुख असलेले रॉबिन शटॉक म्हणाले, की या लसीचे प्रमाण कमी असेल आणि हा त्याचा फायदा आहे. त्यामुळे लसीचे लक्षावधी डोस वेगाने तयार केले जाऊ शकतात.
कोरोनाच्या सिंथॅटिक जेनेटिक कोडचा इम्पीरिअल लसीमध्ये वापर करण्यात आला आहे. ही लस स्नायूमधून दिली जाते. या लसीमुळे शरीराच्या पेशींना कोरोना विषाणूवर स्पाईकी प्रथिनांची कॉपी करण्याची स्वत:हून सूचना दिली जाते. वैज्ञानिकांनी एवढ्या वेगाने कधीच लसनिर्मिती केली नाही. असे असले तरी ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड आणि अमेरिकेने लसीच्या उत्पादनासाठी आगाऊ ऑर्डर दिली आहे.
रॉबिन शटॉक म्हणाले, की ही लस परिणामकारक ठरली तर कोणत्याही विशिष्ट कंपनीला लसनिर्मितीचा परवाना देण्यात येणार नाही. मात्र, जगभरातील विविध उत्पादकांना परवानगी देऊन भागीदार करण्यात येणार आहे. हा केवळ सामाजिक व्यवसाय आहेत. त्यातून कोणताही फायदा मिळत नाही. लसनिर्मितीचा खर्च कमी असेल, असेही त्यांनी सांगितले. जगात रोज 1 लाख कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी म्हटले आहे.