स्टॉकहोम - यावर्षीचे साहित्यातील नोबेल पारितोषिक कादंबरीकार अब्दुलरझाक गुर्नाह यांना प्रदान करण्यात आले आहे. नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. साहित्यासाठी नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे गुर्नाह हे कृष्णवर्णीय आफ्रिकी आहेत. अब्दुलरझाक गुर्नाह यांनी वसाहतवादाचे परिणाम आणि संस्कृतीबद्दल बरेच लिहले आहे.
अब्दुलरझाक गुर्नाह यांनी आतापर्यंत दहा कादंबऱ्या आणि अनेक लघुकथा प्रकाशित केल्या आहेत. ‘पॅराडाइज’ आणि ‘डेझर्शन’ या कादंबऱ्या लक्षणीय आहेत. अब्दुलरझाक गुर्नाह यांचा जन्म झांझीबार बेटावर 1948 मध्ये झाला. सध्या ते इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहेत. 1960 च्या उत्तरार्धात शरणार्थी म्हणून इंग्लंडमध्ये आले होते. निर्वासितांच्या समस्या त्यांच्या लेखनाचा प्रमुख विषय आहे.
दरवर्षी ऑक्टोबरमध्ये नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात येते. त्यानंतर डिसेंबरमध्ये पारितोषिक वितरण सोहळा पार पडतो. यावर्षीही पारितोषिक विजेत्यांची घोषणा नेहमीप्रमाणे होणार असली, तरी पुरस्कार वितरण सोहळा मात्र कशा प्रकारे आयोजित केला जाईल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तर गेल्यावर्षी 2020 चे साहित्यातील नोबेल अमेरिकेतील कवयित्री लुईस ग्लुक यांना जाहीर झाला होता.
हेही वाचा - नोबेल २०२० : साहित्यातील नोबेल अमेरिकेच्या लुईस ग्लुक यांना जाहीर