मॉस्को : अमेरिकेचा माजी सुरक्षा कंत्राटदार असणाऱ्या एडवर्ड स्नोडनला रशियात कायम वास्तव्य करण्याची परवानगी मिळाली आहे. त्याच्या वकीलाने गुरुवारी याबाबत माहिती दिली.
स्नोडन हा अमेरिकेतील सुरक्षा व्यवस्थेसाठी काम करत असे. अमेरिकेतील सुरक्षा संस्था एफबीआयकडून सामान्य नागरिकांवर होत असलेल्या अवैध हेरगिरीला स्नोडनने वाचा फोडली होती. यानंतर २०१३ पासून त्याने रशियामध्ये आश्रय घेतला होता.
स्नोडनचे रशियन वकील अँटोनी कुचेरेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नोडनने यावर्षी एप्रिलमध्येच कायम वास्तव्य करण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यावरील सुनावणीस उशीर झाला. २०१९मध्ये रशियाने आपल्या इमिग्रेशन कायद्यांमध्ये बदल केल्यामुळे स्नोडनला अशी याचिका दाखल करता आली, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, रशियाचे नागरिकत्व मिळण्यासाठीचा अर्ज स्नोडन करणार नसल्याचेही त्याच्या वकीलांनी सांगितले.
दरम्यान, स्नोडनने गेल्या वर्षी अमेरिकेत परतण्याची तयारी दाखवली होती. मात्र, आपल्यावरील खटला योग्य पद्धतीने चालवला जाणार असल्याची हमी त्याने या बदल्यात मागितली होती.
हेही वाचा : 'भारत-चीनमधील हवा घाणेरडी'; अध्यक्षीय डिबेटदरम्यान ट्रम्प यांचे वक्तव्य