मॉस्को : भारतातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटोरीज या कंपनीला रशिया आपल्या कोरोनावरील लसीचे १०० दशलक्ष डोस देणार आहे. रशियन डायरेक्ट इन्ह्वेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) बुधवारी याबाबतची माहिती दिली.
रशियाचा सार्वभौम संपत्ती निधी असलेले आरडीआयएफ आणि डॉ रेड्डीज यांच्यादरम्यान कोरोना लसीच्या चाचणी आणि वितरणासंबंधी करार झाला आहे. त्यानुसार, रशियाच्या स्पुटनिक-५ या लसीच्या वापरास परवानगी मिळाल्यानंतर भारतात त्याचे वितरण डॉ. रेड्डीज मार्फत केले जाणार आहे अशी माहिती आरडीआयएफने दिली. २०२०च्या शेवटी या लसी डॉ. रेड्डीजपर्यंत पोहोचवण्यात येतील.
यासोबतच, भारतात स्पुटनिक-५च्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीही डॉ. रेड्डीज मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी संचालक आणि सह-अध्यक्ष जी. व्ही. प्रसाद यांनी दिली. या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी ठरल्यामुळे आशा निर्माण झाली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही लस मोलाची कामगिरी बजावेल, असे मत प्रसाद यांनी व्यक्त केले.
गेल्या २५ वर्षांपासून रशियामध्ये डॉ. रेड्डीज ही प्रतिष्ठित कंपनी आहे. तसेच, भारतातही ही कंपनी लोकप्रिय आहे. त्यामुळे या कंपनीशी करार करताना मला आनंद होतो आहे, असे मत आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी संचालक किरिल डिमित्रिव्ह यांनी सांगितले.
हेही वाचा : नागरिकांना देणार मोफत कोरोना लस ; अमेरिकन सरकारने आखली योजना