पॅरिस - २१३ वर्षांमध्ये पहिल्यांदाच पॅरिसच्या नॉत्रे डेम कॅथेड्रलमध्ये 'ख्रिसमस मास'चे आयोजन करण्यात येणार नाही. 'एल्फ न्यूज' या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
इसवी सन १८०३ पासून नॉत्रे डेम या गॉथिक कॅथेड्रलमध्ये नाताळनिमित्त प्रार्थनेचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, यावर्षी १५ एप्रिलला झालेल्या दुर्घटनेमुळे या प्रथेमध्ये खंड पडला आहे. याऐवजी, आता डीन पॅट्रिक चाऊवेट यांनी आयोजित केलेली प्रार्थना ही 'सेंट जर्मेन आय'ऑक्सेरिअस' या चर्चमध्ये होणार आहे. हे चर्च 'नॉत्रे डेम' पासून एक किलोमीटर दूर आहे. १५ एप्रिलनंतर 'नॉत्रे डेम'मध्ये आयोजित करण्यात येणारी रविवारची प्रार्थना याच चर्चमध्ये होत होती.
१५ एप्रिलला या कॅथेड्रलला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये कॅथेड्रल छत आणि मचाण पूर्णपणे जळून गेले होते. सुदैवाने नॉत्रे डेमची मुख्य इमारत वाचवण्यात अग्नीशामक दलाला यश मिळाले होते. त्यानंतर या कॅथेड्रलच्या पुनर्बांधणीला सुरूवात करण्यात आली होती. हे मचाण अजूनही धोकादायक स्थितीमध्ये असल्याची माहिती शहराचे आर्चबिशेप मिशेल यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, की कॅथेड्रलच्या छताचा आणि मचाणाचा लोखंडी सांगाडा काळजीपूर्वक पूर्णपणे काढण्यास आणखी काही महिने लागू शकतात. त्यानंतर ९०० ते १,००० डिग्री सेल्सिअस पर्यंतच्या तापमानापर्यंतच्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या गोल घुमटांची तपासणी केली जाईल. मचाणाच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेले ५०० टन वजनी लोखंडी पाईप्स हे एक-एक करून काढावे लागणार आहेत. पुनर्बांधणीच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करण्यासाठी वसंत ऋतुपर्यंत थांबण्याची गरज आहे. त्यानंतर, २०२१च्या सुरूवातीला पुढील बांधकाम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
केवळ एकत्रिकरणाच्या टप्प्यासाठीच साधारणपणे ८५ दशलक्ष युरो खर्च होण्याची शक्यता आहे. सध्या ११० देशांमधील नागरिकांनी मिळून किमान ९०० दशलक्ष युरोंची देणगी देण्याचे वचन दिले आहे. यातूनच पॅरिसचा इतिहास आणि नॉत्रे डेमबद्दल लोकांमध्ये असणारे प्रेम स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया मिशेल यांनी दिली.
'नॉत्रे डेम'ची पुनर्बांधणी करणारे जनरल जीन-लुईस जॉर्जेलिन म्हणाले, की हे कॅथेड्रल १६ एप्रिल २०२४मध्ये पुन्हा सुरू करण्यात येईल.
हेही वाचा : मुंबईतील 'हे' चर्च ठरत आहे नाताळचे खास आकर्षण