मॉस्को : 19 प्रवाशांसह बेपत्ता झालेले रशियाचे एक छोटे विमान पुन्हा सापडले असून विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने दिली आहे. विमानाचे इंजिन फेल झाल्याने त्याचे इमर्जन्सी लँडींग करावी लागल्याची माहिती मंत्रालयाने माध्यमांना दिली आहे.
विमान सापडले, सर्व प्रवासी सुखरूप
19 प्रवाशांना घेऊन जाणारे रशियाचे एएन-28 हे विमान शुक्रवारी पश्चिम सायबेरियाच्या टोम्स्क प्रांतावरून उडत असताना अचानक गायब झाले होते. यानंतर रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने तत्काळ याची माहिती देत विमानाचा शोध सुरू केला होता. मात्र हे विमान पुन्हा सापडले आहे. विमानाचे दोन्ही इंजिन फेल झाल्याने त्याचे इमर्जन्सी लँडींग करावे लागल्याची माहिती आपत्कालीन मंत्रालयाने दिली आहे. या विमानातील सर्व 19 प्रवासी आणि क्रु मेंबर्स सुखरुप असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.
एएन-28, सोवियत बनावटीचे छोटे विमान
एएन-28 हे सोवियत बनावटीचे छोटे टर्बोप्रॉप विमान असून रशियासह इतर अनेक देशांतील अनेक छोट्या विमान सेवा कंपन्यांकडून त्याचा वापर केला जातो. शुक्रवारच्या घटनेत बेपत्ता झालेले विमान रशियातील सिला एअरलाईन्सचे होते. ते केद्रोवोयहून टोम्स्कच्या दिशेने जात होते.
हेही वाचा - जळगावात हेलिकॉप्टर कोसळले; एका वैमानिकाचा मृत्यू, महिला वैमानिक जखमी