रोम - संसदेमध्ये अधिवेशन सुरू असताना, एका संसद सभासदाने त्याच्या भाषणाच्या शेवटी चक्क आपल्या प्रियसीला लग्नाची मागणी घातली. ही घटना आपल्या देशात नाही, तर इटलीमध्ये घडली आहे. फ्लावियो दी मुरो असे या सदस्याचे नाव आहे.
इटालियन संसदेच्या अधिवेशनात फ्लावियोचे भाषण सुरू होते. आपल्या भाषणाच्या शेवटी त्याने, मी जे करत आहे ते कृपया सहन करा अशी सर्व खासदारांना आणि सभापतींना विनंती केली. त्यानंतर, त्याने खिशातून अंगठी असलेली छोटी डबी बाहेर काढली आणि 'एलिसा विल यू मॅरी मी?' अशा शब्दांमध्ये त्याच्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातली. संसदेमध्ये अतिथींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेवरून त्याची प्रेयसी संसदेचे कामकाज पाहत होती.
या प्रकारानंतर, सर्व खासदारांनी टाळ्यांच्या गजरात या दोघांचे अभिनंदन केले. लोकशाही पक्षाच्या सिनेट सदस्या स्टेफिना पेझोपेन यांनी त्यानंतर भाषण करताना या दोघांचे अभिनंदन केले आणि प्रेमाचा नेहमीच विजय होतो! असे उद्गार काढले. संसदेचे सभापती रॉबर्टो फिकोंनी मात्र खासदारांना संसदीय कामकाजाकडे लक्ष देण्यास सांगितले.
या घटनेमुळे काही क्षणांसाठी संसदेचे वातावरण निवळले असले तरी, काल संसदेचे वातावरण मात्र तापलेले होते. नॉर्थर्न लीग आणि लोकशाही पक्षाच्या आमदारांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर संसदेत गदारोळ झाला, त्यामुळे फिको यांना संसदेचे कामकाज स्थगित करावे लागले.
हेही वाचा : ...तर बंद होऊ शकते तुमचे ट्विटर अकाऊंट