हेग : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) रशियाला युक्रेनवरील हल्ले तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत. हेग, नेदरलँड्स येथे बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (ICJ) 15 पैकी 13 न्यायाधीशांनी रशियाकडून युक्रेनवर बळाचा वापर केल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
रशियाच्या बाजूने दोन मते
रशियाच्या विरोधात मतदान करणाऱ्यांमध्ये भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांचाही समावेश होता. रशियाच्या बाजूने फक्त दोन मते पडली. आयसीजेमध्ये रशियाचे न्यायाधीश किरील गेव्होर्जियन आणि चीनचे न्यायाधीश स्यू हॅनकिन यांनी रशियाच्या बाजूने मतदान केले. भंडारी यांनी युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, स्लोव्हाकिया, मोरोक्को, फ्रान्स, ब्राझील, सोमालिया, युगांडा, जमैका आणि लेबनॉन येथील न्यायाधीशांसह आदेशाच्या बाजूने मतदान केले. रशियन हल्ल्यानंतर, युक्रेनने 24 फेब्रुवारी रोजी हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) अपील केले.
शत्रुत्व संपविण्याचे भारताचे आवाहन
दलवीर भंडारी यांच्या मताने आंतरराष्ट्रीय समुदायाला धक्का बसला आहे, कारण त्यांनी भारताच्या भूमिकेच्या विरुद्ध निकाल दिला आहे. भारत युक्रेन-रशिया संघर्षावर मतदान करण्यापासून दूर आहे. संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा परिषदेत मतदानादरम्यान भारत तटस्थ राहिला. भारतीय प्रतिनिधींनी आतापर्यंत सर्व मंचांवर दोन्ही देशांना संवादावर भर देण्याचे आणि शत्रुत्व संपवण्याचे आवाहन केले आहे.
२०१२ पासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात
न्यायमूर्ती भंडारी 27 एप्रिल 2012 पासून ICJ चे सदस्य आहेत. 6 फेब्रुवारी 2018 पासून नऊ वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची पुन्हा निवड झाली. 2017 मध्ये त्यांचा पहिला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, भारताने त्यांना पुन्हा ICJ साठी मैदानात उतरवले. त्यांच्या निवडीमुळे ब्रिटनचे उमेदवार ख्रिस्तोफर ग्रीनवुड यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली.
भारतात केले आहे प्रदीर्घ काम
कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती भंडारी हे ११ न्यायाधीशांच्या खंडपीठाचे सदस्य होते. भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यकाळातही ते त्यांच्या निर्णयांमुळे चर्चेत राहिले. घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी करताना त्यांनी हिंदू विवाह कायदा, 1955 मध्ये सुधारणा सुचवली. याशिवाय मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराबाबतही त्यांच्या निर्णयावर चर्चा झाली.