मॉस्को : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा करार निश्चित केला आहे. या करारानुसार, एके-४७ २०३ प्रकारच्या रायफल आता देशातच तयार होणार आहेत. गुरुवारी हा करार पार पडला.
'एके-४७ २०३' ही रायफल एके-४७ प्रकारच्या रायफलींचे सर्वात अद्ययावत मॉडेल आहे. देशातील लष्कराकडे असलेल्या ५.५६x४५ एमएम असॉल्ट रायफलची जागा ही नवीन रायफल घेणार आहे. आपल्या लष्कराला सध्या ७ लाख ७० हजार एके-४७ २०३ रायफलींची गरज आहे. त्यांपैकी एक लाख रायफल्स आयात केल्या जातील, तर बाकी सर्व रायफल्स भारतातच तयार केल्या जातील. रशियाच्या स्पुटनिक वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.
लष्करी निर्यातीसाठी रशियन राज्य संस्था, रोसोबोरोनएक्सपोर्ट, आणि कलश्नीकोव्ह कन्सर्न-ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड (ओएफबी) यांच्यात स्थापन झालेल्या इंडो-रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड (आयआरआरपीएल) चा संयुक्त उद्यम भाग म्हणून या रायफल्सची निर्मिती भारतात केली जाईल.
आयआरआरपीएलमध्ये ओएफबीचा ५०.५ टक्के वाटा आसेल, तर कलश्नीकोव्ह ग्रुपचा ४२ टक्के वाटा असेल. बाकी उरलेला ७.५ टक्के वाटा हा रशियाची राज्य संस्था रोसोबोरोनएक्सपोर्ट याचा असेल.
हेही वाचा : 'भारत-अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम'ला पंतप्रधान मोदींनी केले संबोधित; म्हणाले...