फ्रँकफर्ट - दुसरे महायुद्ध संपून आता 75 वर्ष झाली. मात्र, जर्मनीमध्ये अजूनही युद्धकालीन बॉम्ब सापडत आहेत. नुकतेच फ्रँकफर्ट शहरातील कन्वेशन सेंटर येथे बांधकाम सुरु असताना 500 किलो वजनाचा बॉम्ब सापडला आहे. त्याला नष्ट करण्याचे काम आता बॉम्ब नाशक पथकाकडून सुरू करण्यात आले आहे.
या बॉम्बला नष्ट करण्यासाठी पोलीस आणि अग्निशामक दलाने परिसरातील सुमारे 3 हजार नागरिकांना घर सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. या भागातून जाणाऱ्या बस आणि रेल्वेसेवाही थांबविण्यात आल्या आहेत. सर्व परिसराला पोलिसांनी वेढा दिला असून जुनाट बॉम्ब नष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आज(शुक्रवार) दुपारपर्यंत बॉम्ब निकामी करण्याचे काम होईल, अशी आशा प्रशासनाला आहे.
75 वर्षांनंतरही जर्मनीत सापडतात बॉम्ब
दुसऱ्या महायुद्ध हे आत्तापर्यंतचे सर्वात विध्वंसक युद्ध समजले जाते. या युद्धात शहरेच्या शहरे बेचिराख करण्यात आली. स्वत: जर्मनी 'ब्लिस्झ क्रिग' म्हणजे विमानांनी एखाद्या शहरावर बॉम्बचा वर्षाव करून त्याला नष्ट करत असे. मग रगणाडे शहरात घुसवून ताबा घेत असत. त्यावेळी न फुटलेले आणि विविध ठिकाणी साठा करून ठेवलेले जुने बॉम्ब अजूनही बांधकाम किंवा खोदकाम करताना सापडतात. हे तेथील नागरिकांसाठी सर्वसामान्य असून याआधी असे बॉम्ब आढळून आले आहेत.