नवी दिल्ली - जगभरामध्ये काल(गुरुवारी) कोरोनाच्या संसर्गामुळे १ हजार ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये काल ४२७ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनपेक्षा जास्त बळी इटलीमध्ये गेले आहेत. चीनमध्ये ३ हजार २४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमधील मृतांचा आकडा ३ हजार ४०५ झाला आहे. त्याखालोखाल इराणमध्ये १ हजार ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.
जगभराममध्ये १० हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. स्पेन, जर्मनी, अमेरिका आणि फ्रान्समध्ये कोरोनाच्या रुग्णांची आणि बळींची संख्या वाढत आहे. काल दिवसभरात स्पेन, जर्मनी, अमेरिका आणि फ्रान्समध्ये अनुक्रमे १९३, १६, ६८, १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरामध्ये कोरोनाची दहशत पसरली आहे. भारतामध्ये १९४ जणांना कोरोची लागण झाली आहे. तर ५ हजारापेक्षा जास्त नागरिकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
कोरोनामुळे जगभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक देशांनी विमान सेवा बंद ठेवील असून नागरिकांवर निर्बंध लादले आहेत. सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावरही परिणाम झाला आहे. युरोपमध्ये आता कोरोनाने सर्वात जास्त थैमान घातले आहे. तर चीनमध्ये संसर्गाचे प्रमाण घटले आहे. चीनमधून आता कोरोना दीडशेपेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे आणिबाणीच्या परिस्थितीसाठी राखीव निधी असतो. या ठेवीतून ५० अब्ज डॉलर कमी उत्पन्न आणि विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या देशांना कोरोनाचा सामना करण्यासाठी तत्काळ देणे शक्य असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी याबाबत माहिती दिली आहे.