पॅरिस - कोरोना विषाणू जगभरात वेगाने पसरत आहे. आतापर्यंत एकूण १०० देशांमध्ये या विषाणूचा प्रसार झाला असून, किमान एक लाख दहा हजार लोकांना याची लागण झाली आहे.
सोमवारी इराणमध्ये ६०० नागरिकांना या विषाणूची लागण झाल्यानंतर, देशातील एकूण रुग्णांची संख्या सात हजारांवर गेली. तर चीनमध्ये साधारणपणे ८० हजारांहून अधिक नागरिकांना याचा संसर्ग झाला आहे.
जगभरातील सरकारे या विषाणूला लढा देण्यासाठी सज्ज होत आहेत. मोठमोठे कार्यक्रम, क्रीडा महोत्सव आणि स्पर्धा या रद्द करण्यात येत आहेत, किंवा पुढे ढकलण्यात येत आहेत. यासोबतच कित्येक देशांमध्ये नागरिकांच्या प्रवासावर बंधने घालण्यात आली आहेत. या विषाणूचा परिणाम शाळांवरही होत असून, कितीतरी देशांमधील शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
या विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत ३,८०० लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनव्यतिरिक्त इतर देशांमध्येही मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इटलीमध्ये आतापर्यंत ७,३७५ रुग्णांपैकी ३६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दक्षिण कोरियामध्येही साधारणपणे तितक्याच रुग्णांपैकी ५१ जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतात आतापर्यंत कोरोनाचे ४४ रूग्ण आढळले असून, त्यामध्ये इटलीच्या १६ नागरिकांचा समावेश आहे. तसेच, या ४४ पैकी केरळमधील तिघांची प्रकृती ठीक झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
हेही वाचा : कर्नाटकात आढळला कोरोनाचा नवा रुग्ण, देशात आतापर्यंत ४४ जणांना लागण..