लंडन : ब्रिटनमध्ये आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यासाठी ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीने संयुक्तरित्या तयार केलेल्या 'कोव्हिशिल्ड' कोरोना लसीचा वापर केला जात आहे. या लसीचा पहिल डोस ब्रायन पिंकर या ८२ वर्षीय व्यक्तीला देण्यात आला.
गेल्या महिन्यात मिळाली परवानगी..
युनायटेड किंगडमने गेल्या महिन्यात ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीच्या वापराला परवानगी दिली होती. यापूर्वी ब्रिटनमध्ये फायझरच्या कोरोना लसीच्या वापराला परवानगी मिळाली आहे. आता ब्रिटनमध्ये एकूण दोन लसींचा वापर करुन लसीकरण राबवण्यात येत आहे.
अदर पूनावालांनी व्यक्त केला आनंद..
या बातमीनंतर सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आनंद व्यक्त केला आहे. ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचे भारतात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे ब्रिटन सरकारने दाखवलेल्या या विश्वासामुळे आमचा हुरुप वाढला असल्याचे अदर म्हणाले.
भारतात पूर्ण परवानगी मिळण्याची प्रतीक्षा..
सध्या देशात कोव्हिशिल्डच्या अत्यावश्यक आणि मर्यादित वापराला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता ब्रिटनने परवानगी दिल्यानंतर, भारत सरकारही लसीच्या पूर्ण वापराला परवानगी देईल याची प्रतीक्षा आपण करत असल्याचे अदर म्हणाले.
हेही वाचा : मासिक पाळीशी निगडीत वस्तूंवरील अतिरिक्त कर रद्द! ब्रिटनचा निर्णय