लंडन - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असताना आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. मात्र, प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने जॉन्सन आयसीयूमधून बाहेर आले आहेत. डाऊनिंग स्ट्रीटने यासंदर्भातली माहिती दिली आहे.
सोमवारी त्यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने त्यांना आयसीयूत दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर जॉनसन यांना आता आयसीयूत भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर लंडनमधील थॉमस रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते.खबरदारी म्हणून त्यांना व्हेंटिलेटरही पुरवण्यात आले.
दरम्यान जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. आत्तापर्यंत 15 लाख 54 हजार नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे, तर 91 हजार 828 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 3 लाख 45 हजार रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत. युरोप खंडातील रुग्णांची संख्याही 6 लाखांच्या पुढे गेली आहे. चीनमधील परिस्थिती सुधारत असताना युरोप आणि अमेरिकेतील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.