बाकू - अर्मेनिया आणि अझरबैजान देशात मागील काही दिवसांपासून युद्ध सुरू होते. दोन्ही देशांनी रशियाच्या मध्यस्थीने नव्याने शस्त्रसंधी करार केला आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर असलेल्या नागोर्नो काराबाख भूप्रदेशाच्या मालकी हक्कावरून दोन्ही देशांत लष्करी संघर्ष सुरू झाला होता.
रशियाने मध्यस्थी करत दोन्ही देशांना शस्त्रसंधी करण्यास तयार केले. शनिवारी मध्यरात्रीपासून ही शस्त्रसंधी लागू झाली आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचा आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गी लावरोव्ह यांच्यात करार होण्याआधी फोनवर चर्चा झाली. दोन्ही देशांनी मास्को कराराचे पालन करण्याचे आवाहन लावरोव्ह यांनी केले.
नागोर्नो काराबाख हा भूप्रदेश अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांच्या सीमेवर आहे. भौगोलिक दृष्या हा भाग अझरबैजान देशात येत असला तरी यावर अर्मेनियाचे नियंत्रण आहे. २७ सप्टेंबरपासून या भागाच्या मालकीसाठी दोन्ही देशांत पुन्हा युद्ध सुरू झाले होते. त्यास आता शस्त्रसंधीने विराम मिळाला आहे. या युद्धात शेकडो सैनिक आणि नागरिक ठार झाले आहेत. अर्मेनिया ख्रिस्ती तर अझरबैजान मुस्लिम बहुल देश आहेत.