जाग्रेब - क्रोएशियामध्ये झालेल्या भूकंपात सात जण ठार आणि 20 जखमी झाले आहेत. हा भूकंप 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेत आहेत.
मंगळवारी दुपारी 12.19 वाजता क्रोएशियाची राजधानी जाग्रेबच्या दक्षिणपूर्व पूर्वेस सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रिंजा या छोट्या शहरात भूकंपाचा धक्का बसला, असे सिन्हुआने मंगळवारी सांगितले.
बाधित क्षेत्रात घरांची छपरे कोसळली आहेत. तर अनेक इमारती व चारचाकींचेही नुकसान झाले आहे, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे.
पेट्रिंजाचे महापौर डारिंको डॅम्बोविक यांनी पत्रकारांना सांगितले की, 'माझे शहर पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. आमच्या इथे मुलांचा मृत्यू झाला आहे. त्याचे वर्णन करता येणार नाही. हे हिरोशिमासारखे आहे. निम्मे शहर होत्याचे नव्हते झाले आहे.'
घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान अँड्रजेज प्लॅनकोव्हिक, अध्यक्ष जोरान मिलानोविच आणि अन्य काही मंत्री यांनी शहराला भेट दिली.
'आम्ही दु: खी आहोत. ही एक शोकपूर्ण दुर्घटना आहे. सैन्य येथे आहे आणि पोलीस, नागरी सुरक्षा, अग्निशमन, आपत्कालीन वैद्यकीय सेवा पोहोचत आहेत,' असे प्लॅनकोविच यांनी पेट्रिंजा येथे पत्रकारांना सांगितले.
हेही वाचा - झिम्बाब्वेमध्ये चक्रीवादळाची भीती, निर्वासन केंद्रांची यादी जाहीर
याआधी सोमवारी पहाटे 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के याच भागात जाणवले होते. परंतु, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मंगळवारी झालेल्या भूकंपाचा धक्का संपूर्ण देशभरात जाणवला. राजधानी जाग्रेबलाही भूकंपाचा फटका बसला.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेली काऊन्टी दरम्यानच्या प्रवासावरील बंदी सरकारने नुकतीच दूर केली होती.
मार्च महिन्यातही जाग्रेब येथे 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. यात एकाचा मृत्यू आणि 30 जण जखमी झाले होते.
नुकत्याच झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शेजारच्या स्लोव्हेनियामधील क्रेस्को अणुऊर्जा प्रकल्प खबरदारी म्हणून बंद करण्यात आला आहे. पेट्रिंझाच्या वायव्येस सुमारे 80 किलोमीटरवर हा प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या प्रवक्त्याने स्थानिक माध्यमांना सांगितले की, 'अशा तीव्र भूकंपात असे करणे आवश्यकच होते.'
युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उसुर्ला फॉन डर लेन म्हणाले की, युरोपियन संघ (ईयू) क्रोएशियाला पाठिंबा देईल.
त्यांनी मंगळवारी ट्विट केले की, 'आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत . आम्ही क्रोएशियासोबत उभे आहोत.'
हेही वाचा - इंग्लंडमध्ये अतिबर्फवृष्टीने रस्ते अडवले