स्टॉकहोम - २०१९ चा भौतिकशास्त्र विषयातील नोबेल पुरस्कार हे तीन वैज्ञानिकांना विभागून देण्यात आले. विश्वाची निर्मीती, त्याचा विस्तार आणि पृथ्वीचे विश्वातील स्थान याच्या अभ्यासासाठी जेम्स पीबल्स, मिशेल मेयर आणि दिदियर क्वेलॉझ यांना हा पुरस्कार देण्यात आला.
जेम्स पीबल्स यांना विश्वाच्या उत्क्रांतीपासून आतापर्यंत झालेला विश्वाचा विस्तार याच्या अभ्यासासाठी या पुरस्काराची अर्धी रक्कम मिळणार आहे. तर उरलेली अर्धी रक्कम ही मिशेल मेयर आणि दिदियर क्वेलॉझ यांना संयुक्तपणे सूर्यमालेच्या बाहेरील ग्रहाच्या शोधासाठी मिळणार आहे. रॉयल स्वीडीश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे सरचिटणीस गोरान हँन्सन यांनी ही माहिती दिली.
नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनांसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक 'अल्फ्रेड नोबेल'ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले होते.
नऊ दशलक्ष क्रोनोर (९,१८,००० अमेरिकी डॉलर्स) रोख रक्कम, सुवर्णपदक आणि पदवी असे या पुरस्काराचे स्वरुप असते. अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथी दिवशी (१० डिसेंबर) स्टॉकहोममध्ये पाच विषयांतील नोबेल पारितोषिकांचे वितरण केले जाते. त्याच दिवशी नॉर्वेमध्ये सहाव्या शांततेच्या नोबेल पारितोषिकाचे वितरण केले जाते.
हेही वाचा : नोबेल २०१९ : 'यांना' मिळाला 'शरीरविज्ञान/ वैद्यकशास्त्र' विषयातील नोबेल पुरस्कार!