मॉस्को : रशियामधील आणखी एका कोरोना लसीच्या मानवी चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. देशातील 'व्हेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ व्हायरॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेने तयार केलेल्या कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यामध्ये ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. 'इपिव्हॅक कोरोना' असे या लसीचे नाव आहे.
यापूर्वी रशियाने कोरोनावरील उपचारासाठी तयार केलेल्या 'स्पुटनिक 5' या लसीहून ही लस वेगळी आहे. स्पुटनिक 5ला या अगोदरच कोरोनावरील उपचारासाठी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. इपिव्हॅक कोरोनाची मानवी चाचणी सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल, असे कंपनीने जाहीर केले आहे.
या लसीच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पार पडला आहे. या चाचणीमध्ये ५७ लोकांना ही लस टोचण्यात आली होती. या सर्वांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले. तसेच, या सर्वांमध्ये कोणत्याही प्रकारचे दुष्परिणामही आढळले नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. या लसीच्या दोन डोस नंतर व्यक्तीच्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये लक्षणीय वाढ होते, असे कंपनीने सांगितले आहे. आतापर्यंत केवळ एकाच व्यक्तीला या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोनावरील जगातील पहिली ऑफिशिअल लस-'स्पुटनिक 5'ची मोठ्या प्रमाणात चाचणी करण्याची रशियाची योजना आहे. या चाचणीमध्ये सुमारे ४० हजार लोकांचा समावेश असणार आहे.
हेही वाचा : महात्मा गांधींच्या चष्म्याचा इंग्लंडमध्ये लिलाव; 2 कोटी 55 लाखांची बोली