ओस्लो - फायजर कंपनीने तयार केलेली कोरोना लस टोचल्याने नॉर्वे देशात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. लसीचा डोस घेतल्यानंतर एका दिवसाच्या आत २३ नागरिकांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लस दिल्यानंतर शरीरावर (साईड इफेक्ट) दुष्परिणाम झाल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत व्यक्ती वयस्कर असल्याने गंभीर दुष्परीणाम झाल्याचा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
लस दिल्यानंतर सौम्य लक्षणे जाणवू शकतात -
लसीचा डोस दिल्यानंतर सौम्य ताप, उलटी किंवा मळमळ अशी लक्षणे जाणवू शकतात. मात्र, काही नाजूक रुग्णांवर लसीचे गंभीर दुष्परिणाम झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नॉर्वे मेडिकल एजन्सीने म्हटले आहे. मुख्य वैदकीय अधिकारी सिगुर्ड हॉर्टेमो यांनी याला दुजोरा दिल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिले आहे.
फायजर लस जास्त धोकादायक नाही -
नॉर्वेत सुमारे ३० हजार नागरिकांनी फायजर आणि मॉडेर्ना कंपनीची कोरोना लस घेतली आहे. फायजर लस जास्त धोकादायक नसल्याचे चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे. मात्र, ज्यांची प्रकृती जास्त नाजूक आहे, त्यांना थोडा धोका असू शकतो. त्यामुळे कोणाला लस द्यावी, याचा नीट विचार व्हावा. जे व्यक्तींची प्रकृती अत्यंत नाजूक असून वयस्कर आहेत. त्यांना अभ्यासाअंती लस देण्यात यावी, असे नॉर्वेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
फायजर कंपनीची प्रक्रिया
लस दिल्यानंतर काही व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही नॉर्वेच्या वैद्यकीय विभागाबरोबर मिळून काम करत असून मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती गोळा करत आहोत, असे फायजर कंपनीच्या अधिकृत प्रवक्त्याने म्हटले आहे.