बीजिंग - कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्यानंतर चीन सरकारने वुहानमध्ये वेगाने पावले उचलली आहेत. 11.28 दशलक्षहून अधिक नागरिकांच्या चाचण्या केवळ 5 दिवसांत पूर्ण झाल्या आहेत.
वुहान म्युनिसिपल गव्हर्नमेंटचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल ली ताओ म्हणाले, की सर्व नागरिकांची न्यूक्लिक आणि टेस्टिंग केलेली आहे. 3 ऑगस्टला नागरिकांचे टेस्टिंग करण्यास सुरुवात केली होती. केवळ सहा वर्षांहून कमी वयाची मुले आणि सुट्टीवर गेलेल्या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली नाही. 2 ऑगस्टला काही स्थलांतरित मजुरांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. त्यानंतर वेगाने कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
वुहानमध्ये 7 ऑगस्टला 37 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. तर 41 जणांमध्ये कोरोनाची सौम्यलक्षणे आढळली आहेत. म्युनिसिपल हेल्थ कमिशनचे उपसंचालक पेंग हाउपेंग म्हणाले, की मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू असताना 9 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
जगभरातील कोरोनाचे उगमस्थान वुहान असल्याचा संशय
जगभरात कोरोनाचा प्रसार होवून एक वर्ष उलटले आहे. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूचा फैलाव नक्की कोठून झाला? कोणत्या प्राण्यापासून झाला? याचा वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे शोध लागला नाही. चीनमधील वुहान शहरातील मांस बाजारातून कोरोना जगभरात पसरला असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, त्यास योग्य असे पुरावे अद्यापही मिळाले नाहीत. याच सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटनेचे पथक वुहान शहरात दाखल झाले होते. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेला कोरोनाच्या उगमस्थानाचा शोध लागलेला नाही.