जिनिव्हा - कोरोना लस बनवणाऱ्या कंपन्या आणि श्रीमंती देशांनी द्विपक्षीय करार करू नये असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रायसस यांनी केले आहे. गरीब देशांसह सर्वांना कोरोनाची लस मिळावी, या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नांत अशा करारांमुळे अडथळा येत असल्याचे घेब्रायसस यांनी म्हटले आहे. लसींचा तुटवडा निर्माण होऊन किमती वाढतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
कोव्हॅक्स अभियानाला सहकार्य करा -
४२ देशांनी असे द्विपक्षीय करार केले आहेत. त्यामुळे सर्वांना लस मिळण्यात अडथळा येईल. ज्या देशांकडे अतिरिक्त लसीचा साठा आहे, त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कोव्हॅक्स या अभियानास लस द्यावी, असे आवाहन त्यांनी केला आहे. जर श्रीमंत देश आणि लस बनवणाऱ्या कंपन्यांनी द्विपक्षीय करार केले तर बाजारातील लसीच्या किमती वाढतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
लसींची माहिती फार्मा कंपन्यांनी जाहीर करावी -
गरीब, विकसनशील देशांसह सर्वांना लस मिळावी म्हणून डब्ल्यूएचओने कोव्हॅक्स हे अभियान सुरू केले आहे. मात्र, कोव्हॅक्स अभियानात सहभागी झालेल्या देशांनीही लस बनवणाऱ्या कंपन्यांशी द्विपक्षीय करार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे असे करार करू नका, ही विनंती टेड्रोस यांनी फार्मा कंपन्या आणि जगभरातील देशांना केले आहे. लसींचा माहिती जाहीर करण्याचे विनंतीही त्यांनी फार्मा कंपन्यांना केली आहे.
नवा विषाणू सापडल्यानंतर पुन्हा चिंता वाढली
कोरोनाचा नवा विषाणू सापडला असून आता जगभरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूंचा आकडा वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत लस सर्वांना उपलब्ध व्हावी, यासाठी डब्ल्यूएचओकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत काही देशांकडे गरजेपेक्षा जास्त लसीचे डोस असतील तर त्यामुळे बाजारात तुडवडा होऊन किमती वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.