ऑस्ट्रेलिया - येथील व्हिक्टोरिया राज्याला कोविडचा सर्वात जास्त फटका बसला होता. गेल्या नऊ दिवसांमध्ये व्हिक्टोरियात कोरोनाच्या एकाही रुग्णाची वा बळीची नोंद झाली नाही. त्यामुळे आता शहरातील नागरिकांवर लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मेलबर्न तसेच व्हिक्टोरिया राज्याच्या सीमारेषेवरील नागरिकांना केवळ २५ किमी प्रवासाची मुभा होती. ती आता हटविण्यात आली आहे; परंतु पुढचे निर्देश येईपर्यंत प्रवासादरम्यान सर्वांना मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. सोमवारपासून सर्व राज्यांनी कोविडच्या नियमांमध्ये बदल केले. तसेच वाचनालय, संग्रहालये, सिनेमागृह तसेच धार्मिक आणि घरगुती कार्यक्रमांमध्ये एकावेळी केवळ २० जणांना परवानगी देण्यात आली आहे.
व्हिक्टोरिया राज्यात कोरोनाच्या एकाही रुग्णाची वा बळीची नोंद झाली नसली, तरी व्हिक्टोरियातील नागरिकांनी खबरदारी घेणे टाळू नये, कारण कोरोना अद्याप गेला नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच हे आम्ही केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे; परंतु हा विषाणू आपल्याबरोबर बराच काळ राहणार आहे. त्यामुळे आणीबाणीची स्थिती 6 डिसेंबपर्यंत लागू राहणार असल्याचेही व्हिक्टोरिया प्रशासनाने म्हटले आहे.