वुझन (चीन) - दहशतवादाला देशांनी सहन करू नये. दहशतवादाला समूळ गाडण्यासाठी इतर देशांनी भारतासारखी धडक कारवाई करावी. दहशतवादावर निर्णयाक कारवाई करण्याची वेळ आहे, असे वक्तव्य भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चीनमध्ये सुरू असलेल्या भारत, चीन, रशिया या तीन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत केले.
हा लष्करी हल्ला नव्हता, पाकिस्तानच्या लष्कराला आम्ही लक्ष्य केले नव्हते. जैश-ए-मोहम्मदकडून आमच्यावर होणारा संभाव्य हल्ला टाळण्यासाठी दहशतवाद्यांवर केलेली ही कारवाई आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत सावध झाला होता, त्यांच्या पुढच्या कारवाई आधी आम्ही संयुक्त राष्ट्रांचे नियम पाळून हा हल्ला केला आहे, असे स्वराज यांनी सांगितले.
भारताने कारवाई करताना इतर लोकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. भारत आणि चीनमधील संबंध दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये झालेल्या बैठकीतनंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये चांगल्या सुधारणा झाल्या आहेत, असेही स्वराज म्हणाल्या.