काबूल - पूर्व अफगाणिस्तानमधील गुप्तचर सेवेच्या तळावर आत्मघाती हल्ला झाल्याची घटना घडली. यामध्ये ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, असून ४०पेक्षा जास्त कर्मचारी जखमी आहेत. हा हल्ला पूर्वी गझनी प्रांतात झाल्याचे प्रवक्ते आरीफ नूरी यांनी सांगितले.
सुसाईड बॉम्बरने थेट तळाच्या समोरील दरवाजावर हल्ला केला. त्यानंतर भरधाव वेगाने स्फोटक भरलेले वाहन घेऊन तळाच्या दिशेने आल्याचे नूरी यांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. मात्र, गझनी प्रांतामध्ये तालीबान सक्रीय असून मागील काही हल्ल्यांची जबाबदारी देखील त्यांनी स्वीकारली आहे, असेही त्यांनी सांगितले.
अफगाणचे अध्यक्ष अशरफ घनी आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी अब्दुला अब्दुला यांनी सत्ता सामायिकरण करारावर स्वाक्षरी केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. या राजकीय करारामुळे घनी हे युद्धग्रस्त देशाचे अध्यक्ष आणि अब्दुल्ला हे देशाच्या राष्ट्रीय सलोखा उच्च परिषदेचे नेतृत्व करणार आहेत.