कोलंबो - श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटांची जबाबदारी तेथील सरकारने स्वीकारली आहे. त्यानंतर पोलीस महानिरीक्षक पुजीत जयसुर्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सीरीसेना यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ही जबाबदारी स्वीकारली.
यापूर्वी सीरीसेना यांनी बुधवारी संरक्षण मंत्री हेमासीरी फर्नांडो यांचा राजीनामा मागितला होता. त्यांनी पदत्याग केल्यानंतर पोलीस महानिरीक्षकाला सुद्धा पदत्याग करण्याचे आदेश दिले होते. श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर सरकारवर आरोप प्रत्यारोप होत होते. त्यावरून सरकारने हे पाऊल उचलले आहे.
श्रीलंकेतील हल्ल्यापूर्वी सुरक्षा यंत्रणेला याची माहिती देण्यात आली होती, असा दावा करण्यात येत आहे. त्यावरुन यंत्रणेणे याची काळजी घेणे आवश्यक होते. मात्र, त्यांच्या चुकीमुळे हा हल्ला झाला, असे म्हटले जात आहे. या हल्ल्यात आत्तापर्यंत ३५० लोकांच्या मृत्यूची बातमी मिळाली आहे. त्यामध्ये १० भारतीयांचाही समावेश आहे.
श्रीलंकेच्या कोलंबो, नेगोंबो, कोच्चीखेडे आणि बट्टीकोला येथे २१ एप्रिलला साखळी बॉम्ब स्फोट झाले होते. त्यावेळी ख्रिश्चन समुदाय इस्टर संडे हा सण साजरा करत होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता.