सेऊल : दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे यांनी देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे. टप्प्याटप्प्याने हे लसीकरण पार पडणार आहे. सोमवारी राष्ट्राध्यक्षांनी नववर्षानिमित्त जनतेशी संवाद साधला, यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
फेब्रुवारीच्या शेवटी सुरू होणार लसीकरण..
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या शेवटी हे लसीकरण सुरू होईल. सध्या देशामध्ये कोरोना लसीचे ५६ दशलक्ष डोस तयार आहेत. ५२ दशलक्ष लोकसंखेसाठी हे डोस पुरेसे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच, लसीकरणाचा संपूर्ण आराखडा या महिन्याच्या शेवटीपर्यंत जाहीर करणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले. वैद्यकीय अधिकारी, वयोवृद्ध व्यक्ती, गंभीर आजार असणारे प्रौढ आणि पोलीस-सैनिक अशांना पहिल्या टप्प्यामध्ये लस देण्यात येणार आहे.
देशातील कोरोना आटोक्यात..
कित्येक आठवड्यांनंतर आता दक्षिण कोरियाचा कोविड रुग्णदर अखेर आटोक्यात आला आहे. पाच व्यक्तींहून अधिक लोकांसाठी जमावबंदी, आणि कडक लॉकडाऊन असे विविध निर्बंध लागू ठेवल्यामुळेच हे शक्य झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. सोमवारी दक्षिण कोरियामध्ये ४५१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या ४१ दिवसांमध्ये पहिल्यांदाच एका दिवसात ५००हून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६९ हजार ११४ झाली आहे. तर, आतापर्यंत देशात १,१४० लोकांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : सीरमला सरकारकडून खरेदीचा आदेश; केवळ २०० रुपयांमध्ये उपलब्ध होणार लस