बीजिंग- दक्षिण चिनी समुद्रात मागील काही वर्षांपासून चीनची दादागिरी सुरु आहे. मात्र, चीनच्या या धोरणाला शेजारील राष्ट्रांसह अमेरिकेने कडाडून विरोध केला आहे. संपूर्ण दक्षिण चीन समुद्र मालकीचा असल्याचा चीनचा दावा आहे. दरम्यान, अमेरिकेने या भागात लष्करी सराव सुरु केला आहे. अमेरिकीच्या हवाई दलाची विमाने आणि नौदलाच्या जहाजांनी या भागात हस्पक्षेप वाढवला आहे. त्यामुळे चिनी आणि अमेरिकेच्या लष्करामध्ये संघर्ष होण्याची शक्यता वाढली आहे.
अमेरिकेच्या हवाई आणि नौदलाच्या ताफ्यावर पहिल्यांदा हल्ला करु नका, असा आदेश चीनने आपल्या सैन्याला दिला आहे. तणाव निवळण्यासाठी चीन प्रयत्न करत असल्याचे वृत्त 'साऊथ चायना मार्निंग पोस्ट'ने दिले आहे. कोरोनाचा प्रसार, व्यापारी युद्ध, हाँगकाँगसह दक्षिण चिनी समुद्रावरून दोन्ही देशांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावरील चीनचा दावा अमेरिकेने फेटाळून लावला आहे. हाँगकाँग आणि झिनझियांगमधील मानवी हक्कांच्या मुद्द्यावरूनही दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहे.
नौदलाने आणि हवाई दलाने संयम बाळगण्याचे आवाहन चीनच्या नेतृत्वाने केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले आहे. मागील महिन्यात अमेरिकेचा हवाई ताफा युएसएस रोनाल्ड रेगन आणि युएसएस निमित्झने दक्षिण चिनी समुद्रात हवाई सराव केला. युद्ध क्षमता वाढविण्यासाठी अमेरिकेकडून सराव करण्यात येत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पेओ आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टीका केली आहे. अमेरिकेने ह्युस्टनमधील चीनचे दुतावासही बंद केले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेचे दुतावास कार्यालय बंद केले आहे.