काबुल- अफगाणिस्तान स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाच राजधानी काबुलमध्ये काही ठिकाणी तोफगोळ्यांचा (मॉर्टर शेल) हल्ला झाला आहे. त्यामुळे तालिबान आणि अफगाणिस्तानच्या शांततेवरील चर्चेबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली आहे.
काबुलमधील तोफगोळ्यांच्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने स्वीकारली नाही. तसेच हल्ल्यात कोणी जखमी अथवा नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही. अफगाणिस्तानचे गृहमंत्री तारिक अरियान म्हणाले, काही वाहनांमधून काबुलमधील उत्तर व पूर्व भागात तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला.
प्रत्यक्षदर्शी असलेल्या व्यक्तीच्या माहितीनुसार राजदूत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यालय असलेल्या ठिकाणी किमान एका तोफगोळ्याने हल्ला झाला आहे. अफगाणिस्तान सरकारने 320 तालिबानी कैद्यांना सुटका करणार नसल्याचे सोमवारी जाहीर केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच हा हल्ला झाला आहे. या हल्ल्याबाबत माहिती नसल्याचे तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्लाह मुजाहिद याने सांगितले.
दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घणी हे काबुलमधील संरक्षण मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.