मनिला – रशियाने तयार केलेल्या कोरोनावरील लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी फिलिपाईन्समध्ये होणार आहे. ही चाचणी ऑक्टोबर ते मार्चमध्ये होणार असल्याची माहिती फिलिपाईन्सच्या अध्यक्षांचे प्रवक्ते हॅरी रोक यांनी दिली.
फिलिपाईन्सच्या अध्यक्षांचे प्रवक्ते हॅरी रोक म्हणाले, की चाचणीसाठी रशियन सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्यामधून सुरक्षित आणि कार्यक्षमतेसाठी कोरोनाच्या लसीची हजारो रुग्णांवर चाचणी होणार आहे.
रशियात आणि फिलिपाईन्समध्ये एकाचवेळी कोरोनाच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होणार आहे. फिलिपाईन्सच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून रशियाच्या लसीला एप्रिल 2021 पर्यंत मान्यता मिळेल, असा हॅरी यांनी विश्वास व्यक्त केला.
रशियातील गॅमालेया संशोधन संस्थेने कोरोनावील लस विकसित केली आहे. या लसीला स्पूटनिक व्ही हे नाव देण्यात आले आहे. सर्व तपासण्या करून कोरोनाच्या लसीला मंजुरी दिल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी केला आहे. ही लस मुलीलाही दिल्याचे पुतीन यांनी नुकतेच सांगितले होते.
जगभरात काही देशांकडून स्पूटनिक लसीबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, फिलिपाईन्सने सर्वात प्रथम रशियाच्या लसीची चाचणी आणि उत्पादन करण्यासाठी तयारी दर्शविली आहे. दरम्यान, टाळेबंदीचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांना गोळ्या घाला, असे फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी आदेश दिले होते. त्यामुळे ते जगभरात चर्चेत आले होते.