कोलंबो - श्रीलंकेतील अध्यक्षीय निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले आहेत. यावेळी होणाऱ्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक मतदारांचे मत हे महत्त्वाचे ठरणार आहे. श्रीलंकेच्या एकूण लोकसंख्येपैकी सात टक्के लोक हे ख्रिश्चन आहेत. एप्रिलमध्ये इस्टर संडे दिवशी सेंट अँथनी चर्चवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २५०हून अधिक लोकांचा बळी गेला होता. यामधील दहशतवाद्यांचा अजूनही तपास लागला नाही. त्यामुळे न्यायाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या ख्रिश्चन समाजाचे मत कोणाला मिळेल, हे येणारा काळच ठरवेल.
श्रीलंकेतील ख्रिश्चन समुदायाच्या मनात नक्की काय सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत'चे मुख्य संपादक निशांत शर्मा यांनी सेंट अँथनी चर्चचे फादर ज्यूड फर्नांडो यांची मुलाखत घेतली आहे.
या प्रकरणातील चौकशीच्या कारवाईवर निराश असलेले फादर फर्नांडो म्हणतात, आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहोत. हा हल्ला कोणी आणि का केला हे शोधून काढणे गरजेचे आहे. आम्हाला न्याय मिळायला हवा. हे प्रकरण ताजे असताना, तपासासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, त्यांचा अहवाल समाधानकारक नव्हता. त्यामुळे आता पुन्हा नवीन समितीची स्थापना करण्यात आली आहे. आम्हाला न्याय हवा आहे, त्यामुळे आम्ही चौकशी समितीला सर्वेतोपरी सहकार्य करत आहोत.
निवडणुकींबाबत बोलताना फर्नांडो यांनी स्पष्ट केले आहे, की ख्रिश्चन समुदायाचा कोणत्याही पक्षाकडे विशेष असा कल नाही. आम्ही कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देत नाही. मात्र, मतदान करणे आवश्यक असल्याने, चर्चमार्फत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. श्रीलंकेमधील ही पहिलीच निवडणूक नाही. मतदार स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात, आणि ते त्यादृष्टीने मतदान करतील.
दहशतवादी हल्ल्याचा तपास संथगतीने सुरु असल्याने ख्रिश्चन समुदायामध्ये नाराजी आहे. या क्रूर हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना कधी शिक्षा मिळणार?, हा एकच प्रश्न आम्हाला पडला आहे. लोकांना असे वाटत आहे, की हा हल्ला झाला तेव्हाचे सरकार झाल्या प्रकारातून आपला पाय काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेही लोकांमध्ये नाराजी आहे. या हल्ल्यातून सावरण्यासाठी लोकांना मदत व्हावी, यासाठी चर्चने काही एकत्रित भेटींचे आयोजनही केले होते. यासोबतच चर्चने सुरक्षा व्यवस्थेवरही भर दिली. त्यामुळे लोक आता हळूहळू चर्चकडे पुन्हा येत आहेत.
आशिया उपखंडामध्ये वाढत चाललेल्या दहशतवादाला कशा प्रकारे तोंड देता येईल, यावर बोलताना फादर म्हणाले, आशिया उपखंडातील लोक हे एकत्रितपणे शांतीने राहतात. प्रत्येक देशाला स्वतःची मूल्ये आहेत, स्वतःच्या परंपरा आहेत. भारत आणि श्रीलंकेचेच उदाहरण पाहिले, तर दोन्ही देशांमधील संस्कृती वेगवेगळ्या असल्या, दोन्ही देशांमध्ये सामाजिक फरक असले, तरी दोघांमधील संबंध सलोख्याचे राहिले आहेत. त्यामुळे दहशतवादाला लढा देण्यासाठी आपण आपल्या लोकांना आपल्या संस्कृतीची, परंपरांची मूल्ये शिकवली तरी ते पुरेसे आहे.
या घटनेचा तपास वेगाने व्हावा यासाठी व्हॅटिकन काही दबाव आणत आहे का? असे विचारले असता, फादर म्हणाले, की श्रीलंकेची कॅथलिक बिशप परिषद ही चर्चचे प्रतिनिधित्व करते. ते या मुद्यावरून दबाव कायम ठेवत आहेत, तसे निवेदन त्यांनी दिले आहे.
संपूर्ण मुलाखतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा : श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याचे बळी अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत..