बीजिंग - हाँगकाँग पोलिसांनी आतापर्यंत २,२०० आंदोलकांना अटक केली असल्याची माहिती हाँगकाँगच्या प्रमुख कॅरी लाम यांनी दिली. हाँगकाँगमध्ये गेल्या चार महिन्यांमध्ये सरकारविरोधात एकूण ४०० आंदोलने झाली आहेत.
हाँगकाँगमधील आंदोलने हळूहळू हिंसक होत आहेत. यामुळे आतापर्यंत जवळपास १,१०० लोक जखमी झाले आहेत, तर २,२०० लोकांना अटक करण्यात आली आहे, असेही लाम यांनी सांगितले. लाम या विधानसभेत आपले वार्षिक धोरण मांडणार होत्या, परंतु लोकशाही-समर्थक सभासदांनी आरडाओरडा केल्यामुळे त्यांना आपले भाषण रद्द करावे लागले. त्यानंतर, एका सुरक्षित ठिकाणावरून त्यांनी व्हिडिओद्वारे आपले भाषण प्रसिद्ध केले.
हाँगकाँग हे नेहमीच जगातील सुरक्षित शहरांपैकी एक राहिले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये प्रत्यार्पण कायद्यात दुरुस्ती स्वीकारण्याच्या विरोधामुळे, त्यासाठी होणाऱ्या आंदोलनांमुळे शहराची ही ओळख पुसली जात आहे. आंदोलकांनी हाँगकाँगमध्ये अनागोंदी आणि भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. आपल्यापेक्षा वेगळे मत असणाऱ्या लोकांना या आंदोलकांनी मारहाण केली. तसेच, शहराचे जनजीवन विस्कळीत केले आहे. असे सांगत, भविष्यात हाँगकाँग कधी असे शहर होईल का जिथे लोक शांततेने राहतील? असा सवाल लाम यांनी केला.
1997 मध्ये पुन्हा चीनमध्ये सामील झालेल्या हाँगकाँगला खास प्रशासकीय दर्जा प्राप्त झाला होता. शहराच्या प्रत्यार्पण कायद्यात प्रस्तावित केलेल्या दुरुस्तीच्या विरोधात सुरुवातीलाही बरीच निदर्शने केली गेली होती. त्यानंतर, लोकांना चाचणीसाठी मुख्य भूमी चीनकडे पाठविण्याची परवानगी देणारे वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयक मागे घेतले गेले होते. नंतर, आंदोलकांनी अतिरिक्त मागण्या निदर्शनास आणून अधिक प्रमाणात आंदोलने करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : मेक्सिकोत सुरक्षा दल- शस्त्रधारी टोळक्यामधे गोळीबार, एका जवानांसह १५ जणांचा मृत्यू