सेऊल - दक्षिण कोरियात कोरोना विषाणूचे आणखी 169 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 1 हजार 146 वर गेली आहे. नवीन 169 रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे डायगु प्रांतात आढळले.
डायगु प्रांतात 134 आणि ग्योनजिंग प्रांतात 19 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले असून शासनाच्या वतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपलब्ध औषधांसह जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दक्षिण कोरियाच्या रोग नियंत्रण व प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होसनी मुबारक यांचा मृत्यू; तीन दशके होते सत्ताधीश
अनेक देशांमध्ये कोरोनाचा धुमाकूळ सुरुच असून इटली, इराण, फ्रान्स, स्पेन या ठिकाणी काही नागरिकांना याची लागण झाली आहे. आखाती राष्ट्र बहरीनमध्ये आत्तापर्यंत 17 लोकांना कोरोनाची लागण झाली. चीनमध्ये रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तरीही जगातील ही सर्वात जास्त रुग्ण संख्या आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत 80 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून यातील 2 हजार 700 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.