काठमांडू - भारताच्या लिपुलेख व कालापानी या भूप्रदेशांवर दावा सांगून त्यांचा नेपाळच्या राजकीय नकाशात समावेश करण्यात मोठी भूमिका पार पाडणारे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांचे राजकीय भवितव्य संकटात आहे. नेपाळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी होणार होती. ती आज पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली असून शुक्रवारी होणार आहे.
नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या 45 सदस्यांच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी होणार होती. मात्र, ती शुक्रवारी होणार असल्याचे पंतप्रधानांच्या प्रेस सल्लागार सूर्य थापा यांनी सांगितले. दरम्यान चौथ्यांदा बैठक तहकूब करण्याचे कारण समोर आले नाही.
भारत आपल्याला पदावरून काढण्याचा कट करीत आहे असे विधान ओली यांनी केले होते. ते राजकीयदृष्टय़ा व राजनैतिक पातळीवर अयोग्य आहे असे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पुष्पकमल दहल म्हणजे प्रचंड यांनी म्हटले.
भारतविरोधी वक्तव्यावरून पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली. लिपुलेख, कालापानी व लिम्पियाधुरा ही ठिकाणे नेपाळच्या राजकीय नकाशात सामील केल्यानंतर जो कट सुरू करण्यात आला त्यात नेपाळी नेत्यांचाही समावेश होता. मला पदावरून हटवण्यासाठी भारत आणि नेपाळमध्ये कट रचण्यात आला आहे, असे ते म्हणाले होते.