काठमांडू : भारतात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यानंतर केवळ एका आठवड्यामध्येच भारताने नेपाळला कोविशिल्ड लसीचे दहा लाख डोस पाठवले आहेत. यासाठी नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.
आमचा शेजारी देश भारत, तेथील लोक आणि विशेष करुन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या देशात लसीकरण सुरू झाल्यानंतर केवळ एका आठवड्यातच त्यांनी आमच्या देशात लस पाठवली आहे. यामुळे आमच्या कोरोनाच्या लढाईला मोठी मदत मिळाली असल्याचेही ते म्हणाले.
तीन महिन्यात पूर्ण करणार लसीकरण..
नेपाळमध्येही कोरोना लसीकरणाला सुरुवात होते आहे. यासाठी बलुवतार शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ओली बोलत होते. तीन महिन्यांमध्ये देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा नेपाळ सरकारचा मानस आहे. पहिल्या टप्प्यामध्ये देशातील सर्व फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस दिली जाणार आहे. देशात ६२ रुग्णालये आणि १२० लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण होणार आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये नेपाळ सरकार भारताने दिलेल्या कोविशिल्डचा वापर करणार आहे. जवळपास साडेचार लाख अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.
हेही वाचा : भारताकडून कोव्हिशिल्ड लस म्यानमार, मॉरिशसला विमानाने रवाना