बँकॉक - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार) 'असोशिएशन ऑफ साऊथ इस्ट एशियन' देशांच्या परिषदेला म्हणजेच आसियान परिषदेला संबोधित करणार आहेत. तसेच यावेळी आसियान गटातील राष्ट्रांमध्ये प्रस्तावित असलेल्या 'रिजनल कॉम्प्रेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप (RCEP) मुक्त व्यापारासबंधीत करारावर चर्चा होणार आहे. आरसीईपी प्रस्ताव मंजूर झाल्यास आसियान गटातील देशांना व्यापारी सवलतींचा फायदा मिळणार आहे. भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे आवाहन त्यांनी थायलंडमधील उद्योजकांना एका कार्यक्रमात केले.
हेही वाचा - भारतीय भूमिकेचे चांगले आकलन झाल्याने काश्मीरवर सौदीचे मौन; सूत्रांची माहिती
थायलंडमधील उद्योजकांना त्यांनी 'ईज ऑफ डुईंग बिझनेस' निर्देशांकात भारताच्या चांगल्या कामगिरीचा दाखला दिला. देशातील भ्रष्टाचार, नोकरशाही, करांचा बोजा कमी होत असून परकीय गुंतवणूक, जंगलांचे प्रमाण, पेटंटची संख्या वाढत असल्याचे मोदी म्हणाले. उद्योग आणि व्यापार करण्यासाठी भारतात येण्याचे आवाहन मोदींनी यावेळी केले.
आरसीईपी करारअंतर्गत वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीसंबधीच्या अटी आणि शर्ती समतोल असाव्यात. त्यामुळे सर्व राष्ट्रांना फायदा होईल. सहभागी देशांचा व्यापक आणि समतोल विकास होण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचेही मोदी एका मुलाखतीमध्ये म्हणाले. आरईसीपी करार मंजूर करण्याबबात आशियान देशांमध्ये सध्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. २०१२ साली कंबोडिया देशामध्ये आरसीईपी कराराचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तेव्हापासून या करारावर चर्चा सुरू आहेत.
हेही वाचा - बँकॉकमध्ये स्वास्दी मोदी! भारत-थायलंड दरम्यान हृदय, विश्वासाचे संबंध, मोदींचं प्रतिपादन
भारत-थायलंड मधील मैत्रीपूर्ण संबंध फक्त दोन्ही देशांच्या सरकार पूरतेच मर्यादित नाहीत. तर इतिहासाच्या प्रत्येक क्षणाने, प्रत्येक घटनेने हे संबंध वृद्धींगत झाले आहेत. दोन्ही देशांदरम्यान असलेले मैत्रीपूर्ण संबंध हृदय, आत्मा, विश्वास आणि अध्यात्माचे असल्याचे काल मोदी म्हणाले.
आरसीईपीमध्ये आसियान समूहाचे १० सदस्य देश ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड, फिलीपीन्स, लाओस आणि व्हिएतनाम हे देश सहभागी होतील. तसेच, त्यांचे ६ एफटीए भागीदार भारत, चीन, जापान, दक्षिण कोरिया , ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हेही या परिषदेत सहभागी होतील.