यंगून - म्यानमारमध्ये लष्कराने बंड करत सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर सध्या तिथले वातावरण ढवळून निघत आहे. उठावाच्या विरोधात असहकार आंदोलनाचीही हाक देण्यात आलेली आहे. आंदोलनासाठी फेसबुकवर पेजची निर्मितीही करण्यात आली आहे ज्याला तेथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाईक केले आहे. म्यानमारमध्ये लष्कराने सध्या फेसबुकवर तात्पुरती बंदी घातली आहे. इंटरनेट युजर्संनीही यावर बोलताना सांगितले, की बुधवारी रात्री पासून सेवेत व्यत्यय येत आहे. मोबाईल सर्व्हिस प्रोवायडर कंपनी टेलिनॉरनेही याला दुजोरा दिला आहे. टेलिनॉरने सांगितले, की मोबाईल ऑपरेटर्स आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर यांना दळणवळण मंत्रालयाकडून दिशानिर्देश प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये फेसबुकवर तात्पुरती बंदी घालण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
फेसबुक ही सोशल नेटवर्किंग साईट म्यानमारमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. सध्या नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी (एनएलडी) ही उठावाच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट शेअर करत आहे. म्यानमारमध्ये लष्कराने बंड करत सत्ता ताब्यात घेतली. लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांच्यासह इतर नेत्यांवर कठोर निर्बंध घातले आहे. म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आंग सान स्यू यांना लष्कराने ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना कुठे ठेवण्यात आले आहे याची कुठलीही अधिकृत माहिती लष्कराकडून देण्यात आलेली नाही. म्यानमारमध्ये स्यू की यांना सोडण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बुधवारी रात्री म्यानमारमधील सर्वसामान्य नागरिकांनी आंग सान स्यू यांना पाठिंबा दर्शवत विरोध प्रदर्शन केले. लष्कराच्या विरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली. लोकांनी थाळीनाद करत व गाड्यांचे हॉर्न मोठ्मोठ्याने वाजवत या कारवाईचा विरोध केला. म्यानमारमध्ये नुकतीच निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत नेत्या आंग सान स्यू की यांच्या पक्षाने घोटाळा केला आहे, असा ठपका लष्कराने ठेवला. लष्कराने पहाटे उठाव करत म्यानमारमध्ये वर्षभरासाठी आणीबाणी लावत असल्याचे जाहीर केले आहे. भारताने सुद्धा म्यानमारच्या सद्य परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया व विविध देशांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे.