बानयुवांगी : गेल्या दोन दिवसांपासून इंडोनेशियाच्या एका पाणबुडीचा शोध घेतला जात होता. या पाणबुडीमध्ये ५३ लोक प्रवास करत होते. या सर्वांना जिवंत शोधण्यासाठी नौदल युद्धपातळीवर याचा शोध घेत होते. मात्र, अखेर आज त्यांनी ही पाणबुडी बुडाल्याचे जाहीर केले.
लष्करप्रमुख हादी जाहजांतो यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ही पाणबुडी ज्याठिकाणी अखेरची दिसून आली होती त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात तेल आणि पाणबुडीचे अवशेष दिसून आले. केआरआय नानग्गला ४०२ ही पाणबुडी बुडाल्याचे हे स्पष्ट पुरावे होते. सरकारला ही पाणबुडी केवळ बेपत्ता झाली असल्याची आशा होती. मात्र, यामध्ये केवळ शनिवारपर्यंतचाच ऑक्सिजन साठा शिल्लक होता.
नौदल प्रमुख युदो मर्गोनो यांनी बालीमधील एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले, की या पाणबुडीचा स्फोट झाला नव्हता. स्फोट झाला असता, तर सोनारवर ते दिसून आले असते. ही पाणबुडी जेव्हा बुडाली, तेव्हा जशीजशी ती जास्त खोल गेली, तशी तिला तडे जाऊ लागले. ही पाणबुडी २०० मीटर पाण्यात तैनात करण्यात आली होती. मात्र, ही ६०० ते ७०० मीटरपर्यंत बुडाली असल्याचा आमचा अंदाज आहे. आम्हाला मिळालेल्या पुराव्यांमुळे आम्ही आता ही पाणबुडी 'बेपत्ता' नाही, तर 'बुडाली' असल्याचे घोषित करत आहोत.
ही पाणबुडी का बुडाली याचे कारण अद्याप स्पष्ट नाही झाले. तसेच, अद्याप ५३ लोकांपैकी कोणाचाही मृतदेह आढळून आला नाही. सध्या २० इंडोनेशियन जहाजे, एक ऑस्ट्रेलियन जहाज, एक इंडोनेशियन विमान आणि एक अमेरिकी विमान या पाणबुडीचा शोध घेत आहे.
हेही वाचा : भारतातील कोरोनास्थिती गंभीर; पाकिस्तानने पुढे केला मदतीचा हात