इस्लामाबाद - भारताला कुलभूषण जाधव यांची केस पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) चालवायची आहे. त्यामुळेच कुलभूषण यांना आणखी एक वकील देण्याची पाकिस्तानची ऑफर भारताने फेटाळली आहे, असा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केला आहे. पाकिस्तानने शत्रूची ही चाल ओळखली आहे. भारताने आयसीजेकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला, असेही कुरेशी म्हणाले. जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा काढण्याचा निर्णय बदलला जात नाही तोपर्यंत भारताशी कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
भारत गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतातही हिंसाचार निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही कुरेशी यांनी केला. पाकिस्तानातील प्रत्येक घडामोडीवर भारत लक्ष ठेवून असल्याचेही ते म्हणाले. भारताकडून सातत्याने यूएनच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कुलभूषण यांना वकील द्या -
कुलभूषण जाधव (५५) यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेर ठरवून एप्रिल २०१७ मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेवर भारताने आक्षेप घेत आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. कुलभूषण यांना वकील देण्याची पाकिस्तानने परवानगी नाकारल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात म्हटले होते. या न्यायालयाने जुलै २०१९ मध्ये कुलभुषण जाधव यांना सुनावलेल्या मृत्यूदंडाचा पुनर्विचार आणि पुनरावलोकन करावे, असा निकाल दिला होता. तसेच कोणतीही दिरंगाई न करता कुलभुषण यांना वकील देण्याची परवानगी द्यावे, असे न्यायालयाने पाकिस्तानला निर्देश दिले होते.
काय आहे कुलभूषण जाधव प्रकरण?
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराने 3 मार्च 2016 मध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपावरून पकडले होते. तेव्हापासून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. तसेच कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय परस्पर फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने याप्रकरणी पाकिस्तानची एकतर्फी भूमिका तसेच कारवाई करण्यावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये भारतीय वकील हरीष साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात खोडून काढले होते. १७ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली होती. याचबरोबर त्यांनी जाधव यांना राजकीय मदत देण्याचे आदेशही पाकिस्तानला दिले होते.