लंडन - फ्रान्समधील नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकाने कोरोनाचा उगम वुहान शहरातील प्रयोगशाळेत झाल्याचा दावा केला आहे. ल्यूक मॉन्टेजिनियर असे या वैज्ञानिकाचे नाव आहे. SARS-CoV-2 विषाणू वुहानमधल्या प्रयोगशाळेतूनच सगळीकडे पसरल्याचा दावा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे.
ल्यूक मॉन्टेजिनियर यांनी इतर वैज्ञानिकासोबत एचआयव्ही विषाणूचा शोध लावला आहे. कोरोना विषाणू्च्या जणुकीय संरचनेत एचआयव्हीचा जीनोम आणि मलेरियाचा जीवाणू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
वुहान शहरातील प्रयोगशाळा कोरोना विषाणूवर 2000 सालापासून संशोधन करत आहे, आणि ते या कामामध्ये तज्ज्ञ आहेत. यातील संशोधनामध्ये त्यांचा हातखंडा आहे, असे मॉन्टेजिनियर यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणू हा चीचने प्रयोगशाळेत तयार केल्याचे वृत्त आधीपासूनच माध्यमांमध्ये येत आहे. मॉन्टेजिनियर यांच्या दाव्यामुळे पुन्हा याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
वुहान शहरातली इन्स्टिट्य़ूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थीकडून अपघाताने हा विषाणू लिक झाला असावा, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.
चीनी संशोधकांनी दावा फेटाळला
कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, वुहान व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेच्या प्रमुखांनी हा दावा फेटाळला आहे. विषाणू मानव निर्मित असू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणू कृत्रिमरित्या तयार करण्यात आला आहे, यास कोणताही पुरावा नाही. या सर्व अफवा आहेत, असे लॅबचे प्रमुख युआन झिमिंग यांनी सांगितले.