बीजिंग - चीनमध्ये उगम झालेला कोरोना विषाणू हा जगभरात वेगाने पसरत आहे. मात्र, चीनमध्ये या विषाणूचे प्रसार होण्याचे प्रमाण जवळपास आटोक्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे प्रवक्ते मी फेंग यांनी ही माहिती दिली.
कोरोना विषाणूचे नवे रुग्ण आढळण्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय घट झाली आहे. सुरुवातीला देशातील वुहान प्रांतामध्ये दिवसाला साधारणपणे तीन हजार नवे रुग्ण आढळून येत होते. मात्र, बुधवारी या प्रांतात केवळ आठ नवे रुग्ण आढळून आले. तसेच हुबेई प्रांताच्या बाहेर, मुख्य चीनमध्येही बुधवारी केवळ सात नवे रुग्ण आढळून आले.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू हा जगातील ११४ देशांमध्ये पसरला आहे. त्यामुळे या विषाणूला जागतिक महामारी घोषित करण्यात आले आहे. यामुळे इटलीने आपल्या सीमा बंद केल्या असून, अमेरिकेनेही युरोपमध्ये जाणारी सर्व विमाने रद्द केली आहेत.
जगभरात आतापर्यंत १,२६,००० लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. तर, ६८ हजारांहून अधिक लोक यातून बरेही झाले आहेत. जॉन हॉपकिन्स विद्यापीठ या सर्व संख्येवर लक्ष ठेऊन आहे, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आकडे समोर आले आहेत.
हेही वाचा : 'COVID-19' आता 'जागतिक महामारी', 'डब्ल्यूएचओ'ने केली घोषणा..