नवी दिल्ली : भारत-चीन सीमातणावाच्या पार्श्वभूमीवर, चीनचे संरक्षण मंत्र्यांनी राजनाथ सिंहांसोबत बैठकीचा प्रस्ताव पुढे केला आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. रशियमध्ये ते शांघाय सहकार संस्थेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
सिंह हे तीन दिवसीय रशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचे उद्दिष्ट केवळ शांघाय सहकार संस्थेची बैठक नसून, यावेळी ते रशियाच्या संरक्षण मंत्र्यांसोबत महत्त्वाची द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. सिंह यावेळी चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेटणार का? याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होत्या. मात्र, तसे कोणतेही नियोजन नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यातच आता चीनच्या संरक्षण मंत्र्यांनी स्वतःहून सिंह यांना बैठकीचा प्रस्ताव पाठवला आहे, तेव्हा त्यावर आता ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सीमेवरील चीनच्या हालचाली वाढतच चालल्या आहेत. गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या घटनेनंतर शांतता चर्चा सुरू असतानाच, २९-३० ऑगस्टच्या दरम्यान चीनच्या लष्कराने पुन्हा पँगॉंग लेकच्या परिसरात आपल्या हालचाली वाढवल्या. त्यावेळी पुन्हा भारतीय लष्कराने चीनच्या सैनिकांना हुसकावून लावले होते. त्यानंतर दोन्ही देशांच्या लष्करादरम्यान ब्रिगेड-कमांडर स्तरावरील दोन बैठका पार पडल्या आहेत.
शांघाय सहकार संस्थेची बैठक आज (शुक्रवार) पार पडणार आहे. या संस्थेचे सदस्य असणाऱ्या आठही देशांचे संरक्षणमंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहेत. प्रादेशिक सुरक्षितता, दहशतवाद अशा विषयांवर या बैठककीदरम्यान चर्चा होणार आहे. शांघाय सहकार संस्थेमध्ये भारत, चीन, कझाकिस्तान, क्रिगिझस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे. या संस्थेचे दोन महत्त्वाचे सदस्य - भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
हेही वाचा : आत्मनिर्भर भारत - आता देशातच तयार होणार 'एके-४७ २०३' रायफल; रशियासोबत झाला करार