बीजिंग - मंगळवारी पहिल्यांदाच चीनमध्ये कोरोनाच्या एकाही नवीन बळीची नोंद झाली नाही. तसेच, देशात एका दिवसामध्ये कोरोनाचे केवळ ३२ नवे रुग्ण आढळून आले. हे सर्वच्या सर्व दुसऱ्या देशांमधून चीनला परतले होते.
कोरोनाचा उगम झाल्यापासून चीनमधील नव्या रुग्णांची आणि बळींची संख्या झपाट्याने वाढत होती. गेल्या काही आठवड्यांपासून मात्र चीनमधील कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचा दर एकदम कमी झाला होता. तरीही काही प्रमाणात नवे रुग्ण आणि बळी आढळणे सुरूच होते. मंगळवारी मात्र चीनमध्ये कोरोनाचा एकही नवा बळी आढळून आला नाही. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचा एकही स्थानिक नवा रुग्ण देशात आढळून आला नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
देशात गेल्या २४ तासांमध्ये आढळून आलेले सर्व ३२ रुग्ण हे विदेशातून परतलेले नागरिक आहेत. तसेच, अशाच दुसऱ्या देशांमधून परतलेल्या १२ नागरिकांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. चीनमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या सध्या १,२४२ आहे. तसेच आणखी १,०३३ संभाव्य रुग्णांना विलगीकरण आणि निरिक्षण कक्षांमध्ये ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा : जपानमध्ये आणीबाणीची घोषणा; राजधानी टोकियोसह 6 भागातील कारभार गव्हर्नरकडे