बीजिंग - चीनची राजधानी बीजिंगमध्ये मागील दोन दिवसांत सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर येथील सर्वात मोठी घाऊक अन्नपदार्थांची बाजारपेठ बंद करण्याचे आदेश दिले. येथील झिनफादी बाजारपेठेत चार हजार दुकाने आहेत. येथील काही कामगार पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. येथे पूर्ण निर्जंतुकीकरण केले जाईल, असे येथील अधिकृत झिन्हुआ न्यूज एजन्सीने सांगितले आहे.
शुक्रवारी बीजिंगमध्ये सहा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले. गुरुवारी आणखी एक प्रकरण समोर आले. मागील 50 दिवसांपेक्षा अधिक काळात चिनी राजधानीत स्थानिक पातळीवर आढळलेली ही सात प्रकरणे आहेत. येथील पहिले तीन रुग्ण समोर आल्यानंतर सर्वांचे लक्ष वेधले गेले. चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, संक्रमित लोकांपैकी दोघे या बाजारात गेले होते आणि तिसऱ्याने त्यातील एकाबरोबर मांस संशोधन संस्थेत काम केले होते.
बाजारपेठेतील कर्मचार्यांची कोरोना चाचणी घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री सांगितले. त्यांनी शहरातील सर्व घाऊक अन्न बाजारपेठांमधील अन्न आणि इतर पर्यावरणीय नमुन्यांच्या चाचणीचे आदेश दिले आहेत. कोरोना संसर्गप्रकरणी अन्न पदार्थांची चाचणी करण्याची गरज पडणे ही बाब गंभीर असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
या नव्या रुग्णांमुळे चीनमधील कोरोना प्रकरणांची संख्या वाढून 83 हजार 75 वर पोहोचली आहे, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे. मात्र, मृतांची संख्या 4 हजार 634 असून त्यात वाढ झालेली नाही.