कराची - पाकिस्तानातील मुख्य विरोधी पक्षनेते बिलावल भुट्टो-झरदारी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे नेते इम्रान आपला पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा स्वतःचा पक्ष आणि जनता त्यांच्या धोरणांवर आणि काम करण्याच्या पद्धतींवर नाराज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पीपीपीचे अध्यक्ष बिलावल यांनी रविवारी जीना स्नातकोत्तर वैद्यकीय केंद्राला (जेपीएमसी) बेट दिली. यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही टिप्पणी केली.
माध्यमांच्या अहवालानुसार, बिलावल यांनी 'संघीय सरकार देश चालवण्यास आणि देशाला योग्य दिशेस नेण्यास सक्षम नाही,' असे म्हटले आहे. याच कारणाने पाकिस्तानात प्रत्येक ठिकाणाहून सरकारच्या जनताविरोधी धोरणांविरोधात असंतोष व्यक्त होत आहे, असे ते म्हणाले.
या 'कठपुतली सरकार'ला सर्वजण कंटाळले आहेत, असेही ते म्हणाले.
'प्रत्येक राजकीय पक्ष आणि व्यापारी, शिक्षक, डॉक्टर, कामगारांसह सर्व स्तरांतील लोक सरकारच्या धोरणांवर नाखूश आहेत. यावरून इम्रान खान त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत, असे मला वाटते,' असे बिलावल यांनी म्हटल्याचे वृत्त आहे.