काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बॉम्बस्फोट झाला असून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. एका कॉम्प्लेक्समध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. एका कारमध्ये हा बॉम्ब ठेवला होता. बॉम्बस्फोटाआधी गोळीबार झाल्याची माहितीही मिळाली आहे. या बॉम्बस्फोटामुळे जवळच असणाऱ्या युद्ध संग्रहालयाचं आणि टीव्ही स्टेशनचे नुकसान झाले आहे. जवळच्या इमारतींनाही या स्फोटाचा हादरा बसला. तालिबानच्या दहशतवाद्यांनी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
'हल्ल्यात ६३ नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा सुरक्षा जवानांचा समावेश असून त्यांच्यातील २० जण जखमी आहेत. यात लहान मुलांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही मुले संग्रहालयात आली होती की, बॉम्बस्फोटाच्या हादऱ्याने पडलेल्या शाळेत होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही,' अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरु आहेत. अमेरिका आणि तालिबानने शांततेच्या चर्चेसाठी सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच हा हल्ला झाला आहे.