काबूल - काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी आणि एका बंदुकधाऱ्याने विमानतळाबाहेर जमलेल्या निर्वासितांवर हल्ला केला. या स्फोटात 60 अफगाण नागरिकांचे आणि 13 अमेरिकन सैनिकांचे प्राण गेले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील निर्वासित रोज मोठ्या प्रमाणावर विमानतळाच्या प्रवेशद्वारावर गोळा होत आहेत. दोन्ही स्फोट हे विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच झाले. हा हल्ला अमेरिकन नागरिकांची आणि इतरांची अफगाणिस्तानातून सुटका करण्यापासून आम्हाला थांबवू शकत नाही, असे एका अमेरिकन अधिकाऱ्याने म्हटलं.
यूएस सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल फ्रँक मँकेन्झी म्हणाले, की विमानतळावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आहे. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर केला जात आहे. सुमारे 5,000 लोक विमानतळावर फ्लाइटच्या प्रतीक्षेत आहेत. गुप्तचर अधिकाऱ्यांनी मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार नागरिकांना विमानतळ सोडून जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. हल्ल्याचा इशारा मिळाल्याच्या काही तासांमध्येच हे स्फोट झाले.
अफगाणिस्ताणमधील आयएसआयएस ही तालिबानपेक्षा खूपच कट्टरपंथी आहे. हल्ल्यांमध्ये तालिबानचा हात नसल्याचे म्हटलं जात आहे. व्हाईट हाऊसच्या एका भावनिक भाषणात, अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष जो बायडेन यांनी दहशतवाद्यांना इशारा दिला, की हा रक्तपात करून अमेरिकेला निर्वासन मोहीम पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. आम्ही अफगाणिस्तानधील प्रत्येक अमेरिकन नागरिकाची सुटका करू. हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना शोधून काढण्यात येईल आणि त्यांना याची जबर किंमत मोजावी लागेल.
अमेरिकेचा ध्वज अर्ध्यावर -
काबुलमधील हल्ल्यात मृत्यूमुखी पडललेल्यांच्या सन्मानार्थ अमेरिकेचा राष्ट्रध्वज येत्या 30 ऑगस्टपर्यंत अर्ध्यावरून फडकावला जाणार आहे. व्हाईट हाऊसने याची माहिती दिली आहे. अफगाणिस्तानातून आतापर्यंत एक लाखाहून अधिक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचेही व्हाईट हाऊसने म्हटले आहे. दरम्यान, 2001 पासून अफगाणिस्तानात मृत्यूमुखी पडलेले 2300 सैनिक, यात जखमी झालेले 20 हजारहून अधिक जवान आणि अमेरिकेच्या या सर्वात दीर्घ युद्धासाठी सेवा देणाऱ्या आठ लाखांहून अधिक नागरिकांचा आम्ही सन्मान करतो असे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी जे ब्लिंकेन यांनी म्हटले आहे.
तालिबान-इसिस संबंधाचे पुरावे नाही - बायडेन
काबुल विमानतळावरील हल्ला इस्लामिक स्टेट आणि तालिबानने संगनमताने केल्याचे पुरावे अजून तरी आपल्याकडे नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
ट्रम्प यांची टीका -
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काबुल विमानतळावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करताना ही दुर्घटना कधीही होऊ द्यायला नको होती, असे म्हटले होते.
संयुक्त राष्ट्र प्रमुखांकडून निषेध -
संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी काबुलमधील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. अफगाणिस्तानातील अनिश्चित स्थिती या हल्ल्यामुळे अधोरेखित झाली आहे, असे गुटेरेस यांनी म्हटलं.
तालिबानचे इसिसशी संगनमत - सालेह
अफगाणिस्तानचे प्रभारी राष्ट्रपती अम्रुल्लाह सालेह यांनी हल्ल्यानंतर तालिबानवर टीका केली आहे. तालिबानने आपला गुरू म्हणजेच पाकिस्तानकडून चांगलीच शिकवण घेतली आहे. तालिबान इसिसशी संबंध नसल्याचे म्हणत आहे. पाकिस्तान ज्या पद्धतीने क्वेटा शुरासोबतचा संबंध नाकारतो. हे अगदी तसेच आहे, असे सालेह यांनी म्हटलं. आमच्याकडे जेवढे पुरावे आहेत. त्यातून आयएस-के चे तालिबानी आणि हक्कानी नेटवर्कशी संबंध असल्याचेच दिसून येते, असे सालेह यांनी ट्विटमधून म्हटलं.
हेही वाचा - काबूल विमानतळावर अव्वाच्या सव्वा दाम; पाण्याची बॉटल 1 हजार तर एक राईस प्लेट 7 हजार 500 रुपयांना