काबूल - गेल्या 50 दिवसांत तालिबानी हल्ल्यात सुमारे 261 अफगाण नागरिक ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांमध्ये 602 इतर नागरिक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या अंतर्गत कामकाज मंत्रालयाने (एमओआय) ही माहिती दिली. या काळात दहशतवादी गटांनी सुमारे 2 हजार हल्ले केले असल्याचेही म्हटले आहे.
अफगाण राष्ट्रीय सुरक्षा आणि इतर सुरक्षा दलांनी तालिबानलाही ताबडतोब प्रत्युत्तर देत त्यांचे मोठे नुकसान केले आहे. गेल्या 50 दिवसांत तालिबानी 2 हजार दहशतवादी मारले गेले असून अनेकजण जखमी झाले आहेत. मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक अरियन यांनी शनिवारी टोलो न्यूजला ही माहिती दिली.
6,000 हून अधिक तालिबान कैद्यांना अफगाणिस्तानने मुक्त केले
हिंसाचार कमी व्हावा आणि युद्धबंदीची घोषणा लवकर केली जावी, या आशेने शांततेच्या भावनेतून 6,000 हून अधिक तालिबान कैद्यांना अफगाणिस्तानने मुक्त केले. मात्र, तालिबानकडून योग्य प्रतिसाद दिला जात नसून युद्ध अजून वाढवण्यावर भर दिला जात आहे. आमच्या लोकांना त्यांनी मुक्त केलेले नाही, असे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गणी यांचे उप प्रवक्ता दावा खान मेनपाल यांनी सांगितले.
तथापि, टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, तालिबान्यांनी या हल्ल्यांमध्ये त्यांचा सहभाग नाकारला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही फक्त सरकारी सैन्यांना लक्ष्य करीत आहोत. तालिबानचे प्रवक्ते झाबीउल्लाह मुजाहिद म्हणाले की, कैद्यांची सुटका हा अमेरिका-तालिबान शांतता कराराचा भाग होता आणि अफगाण सरकारी दलांवरील हल्ले कमी करण्यासाठी कोणत्याही अटी घालण्यात आल्या नव्हत्या.